शिवतनया भाग 1

मला आजही तो दिवस लक्षात आहे. भूतलावरील सगळे ऋषी-मुनी तपस्वी तिथे एकत्रपणे येऊन बसले होते. पुलस्त्य, वशिष्ठ, पुलह, मरीची, भारद्वाज, काश्यप, मनू, अंगिरस,पराशर, आपस्तंभ, गौतम, शंख, लिखित, दक्ष, कात्यायन, जामदग्न्य, याज्ञवल्क्य, ऋष्यशृंग, विमांडक, गर्ग, शौनक, व्यास, शुक्र, नारद, दुर्वास, उग्रतापस, शाकल्य, विश्वमित्र अशी कितीतरी नावं घेतली तरी कमी पडतील. त्याचप्रमाणे धर्म, शतानंद, वैशंपायन, वैष्णव, वार्धक्य, अवस, उप याप्रमाणे भुतलावर निवास करणारे कितीतरी महात्मा तिथे एकत्र आले होते. या सगळ्यांना एक रहस्य जाणून घ्यायचं होतं. आतातरी महर्षी या रहस्य बद्दल आपल्याला सांगतील याची हे सर्व जण वाट बघत होते.


एक अति तेजस्वी महर्षी आपल्या तीर्थयात्रेचे फळ प्राप्त करून झाल्यानंतर इथे येऊन निवास करीत होते, त्यांच्या या तीर्थयात्रे बद्दल ही सर्व मंडळी जाणून घेण्यास अतिशय उत्सुक होती. महर्षींनी तीर्थयात्रेचे फळ तर सांगितले, पण तरीही धर्मराजाच्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता. तो असा की तीनही लोकांमध्ये प्रवाहीत असणारी गंगा-यमुना आणि सरस्वती सोडून, अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जसे की गंगाद्वार, हिमालय, उपचार, कप, ब्रह्म योनी, उग्रतीर्थ, कनखल, केदार क्षेत्र, नैमिषारण्य, गया, कुरुक्षेत्र पुष्करं, इत्यादी सार्‍या तीर्थक्षेत्रांना सोडून महर्षी इथे येऊन मुक्काम करीत आहेत यामागे नक्कीच काही तरी कारण असले पाहिजे… असे वाटून धर्मराजाने सर्व ऋषिमुनी आणि तपस्वी ना प्रदक्षिणा घातली आणि हा प्रश्न महर्षींच्या समोर ठेवला.


या प्रश्नाचे उत्तर देताना महर्षी मार्कंडेयांनी पुरुरवा राजाच्या राज्यसभेत उत्पन्न झालेल्या प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर याचे वर्णन केले. सतत पाप करत असणारा मनुष्य यज्ञ आणि योग्य कर्मांशिवाय देखील स्वर्गलोकात जाऊ शकतो का असा प्रश्न पुरुरवा राजाने त्याच्या राज्यसभेतील ब्राम्हणांना केला होता. ब्राह्मणांनी दिलेले या प्रश्नाचे उत्तर ऐकून मला माझ्याच भाग्याचे कौतुक वाटले. मार्कंडेय महर्षींची ही कथा ऐकता ऐकता काळ मागे लोटल्या प्रमाणे मी देखील भूत काळामध्ये रममाण होऊन गेले. त्यावेळी पुरुरवा राजाचा आणि माझ्या पिताश्रींचा झालेला संवाद मला आजही अगदी स्पष्ट आठवतोय.

मार्कंडेय ऋषी माझी कथा सांगत होते. अनेक तपस्वी ऋषी मुनी आणि तिथे उपस्थित सर्व चराचर माझी कथा कान देऊन ऐकत होते, आणि मी देखील शांतपणे मार्कंडेय ऋषींच्या त्या कथेबरोबर पुन्हा एकदा माझं आयुष्य त्यांच्या तोंडून ऐकत होते.


पुरुरवा राजाने अथक तपश्चर्या करून पिताजींना प्रसन्न करून घेतलं होतं. आता वेळ आली होती ती वर प्राप्त करून घेण्याची. पुरुरवा राजा पिताजींना विनवत होते. या पृथ्वी लोकावर ताप वाढत चाललेले आहे. लाख योजने पसरलेलं हे जंबुद्वीप निराधार होत आहे. येथील देवता मनुष्य आणि पितरे देखिल अतृप्त आहेत, तेव्हा या सगळ्यांसाठी पुरुरवा राजाने माझ्या पृथ्वीवर येण्याची याचना पिताजींजवळ केली होती. पण कुठल्याही आधाराशिवाय मी तरी पृथ्वीतलावर कसं काय जायचं? पिताजींना देखील माझं असं बिना आधाराशिवाय पृथ्वीतलावर जाणं मान्य नव्हतं. मला कुणीतरी धारण केल्याशिवाय माझं पृथ्वीतलावर जाणं अशक्य होतं. माझ्या पृथ्वीतलावर अवतरीत होण्यासाठी कोणीतरी बलाढ्य व्यक्तीने तशी जबाबदारी घेण्याचं सामर्थ्य दाखवणं आवश्यक होतं. अष्ट पर्वतां‌शिवाय अजून बलाढ्य कोण असणार? पिताजी ने आठही पर्वत राजांना बोलावून घेतले. “माझ्या कन्येला पृथ्वीतलावर आणण्यासाठी धारण करण्याचे सामर्थ्य तुमच्यापैकी कोणामध्ये असेल तर तसे मला सांगा”


मी देखील या उत्तराची वाटच बघत होते. अनेक वर्ष स्वर्गलोकात वाहत असताना पिताजींच्या आशीर्वचनाने भूलोकाला पावन करण्याचे एक आगळेवेगळे सामर्थ्य माझ्या प्रवाहात वाहत होते. पृथ्वीतलावर अवतरण्यासाठी मी देखील तयारच होते. मला धारण करण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे याचे उत्तर विंध्यगिरी पर्वत राजाने दिले. ” माझा पुत्र पर्यंक शिवतनयेला पृथ्वीतलावर धारण करण्यास समर्थ आहे, हे महादेव, आपण माझ्या पुत्राला तसा आशीर्वाद द्यावा व शिवतनयेला पर्यंकाच्या शिखरावर स्थित करावं”
ठरल्याप्रमाणे मी पर्यंकगिरी च्या शिखरावर उतरले मात्र माझ्या अमर्याद जलराशी मुळे पृथ्वीतलावर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. अशावेळी सर्व देव देवतांनी मला मर्यादित राहण्यासाठी विनंती केली. “हे कल्याणी लोकांच्या कल्याणा खातर तू पृथ्वीतलावर प्रयाण केले आहे, तेव्हा तिथे तुला तुझे भव्य रूप संकुचित करावे लागेल, कारण पृथ्वीतलावरील असंख्य लेकरांसाठी माता स्वरूप म्हणून तुझे अवतरण झाले आहे, तेव्हा हे नर्मदे, पुरुरवा राजाला तुझ्या जलस्पर्शाने आशीर्वाद देऊन त्याच्या पितरांचे आणि त्याच्या येणाऱ्या पिढ्यांचे तू रक्षण करशील असा आशीर्वाद दे. तुझ्या जलाने तर्पण केल्यावर जे पुण्य प्राप्त होईल ते देवादिकांना सुद्धा दुर्लभ असेल. सरस्वतीचे जल भाविकांना तीन दिवसाच्या स्नानाने पवित्र करते, यमुनेचे जल भाविकांना सात दिवसाच्या स्थानाने पवित्र करते, तर गंगेचे जल एक दिवसाच्या स्नानाने भाविकांना तात्काळ पवित्र करते, परंतु हे नर्मदे, तुझ्या केवळ दर्शनाने देखील मनुष्य पवित्र होईल. तुझ्या तीरावर केलेली कुठलीही तपश्चर्या, वेदपाठ, मंत्रोपदेश, संन्यास इत्यादी सर्व अनंत फलदायक असेल”. असे अनेक आशीर्वाद त्यावेळी पिताजी आणि देवदेवतांनी मला दिले होते. माझ्या या महात्म्या बद्दल मार्कंडेय ऋषी युधिष्ठिर राजाला सविस्तर माहिती देत होते. मी मात्र या सर्व गोष्टी माझ्याच डोळ्यासमोर घडत आहेत की काय अशाप्रकारे अनुभवत होते.


धर्मराज युधिष्ठीर मात्र अजूनही संपूर्ण समाधान पावलेला दिसत नव्हता. त्याच्या मनात एकापाठोपाठ एक अनेक प्रश्न असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्याच्या पुढे येणाऱ्या प्रश्नांसोबत मी मात्र मागे मागेच जाणार होते. धर्मराज युधिष्ठिराने आपला पुढचा प्रश्न मार्कंडेय ऋषी समोर ठेवला. “ऋषिवर, राजा पुरुरवा च्या आधी देखील राजा हिरण्यतेजाने नर्मदादेवीला पृथ्वीतलावर आणल्याचे मी ऐकले आहे… मुनीवर, ते देखील जाणून घेण्याची माझी इच्छा आहेच, तेव्हा त्याबद्दलही आपण ज्ञानार्जन कराल काय?” .. मार्कंडेय ऋषींनी होकारार्थी मान हलवली, परंतु आता विश्राम काल झाला होता. अल्प विश्रामानंतर मार्कंडेय ऋषी माझ्या पृथ्वीतलावरच्या प्रथम अवतरणाची कथा सांगणार आहेत. हे भाविक गण, हे भक्तगण, हे माझ्या‌ वत्सांनो, तुम्ही देखील एका अल्पशा विश्रामानंतर पुन्हा इथे एकत्रित व्हा आणि मार्कंडेय ऋषींकडून माझ्या अवतरणाची कथा ग्रहण करा.

डॉ सुरूचि अग्निहोत्री नाईक

3 thoughts on “शिवतनया भाग 1

  1. नर्मदे हर, नर्मदे हर.
    नर्मदा पुराण कितीही वेळा वाचले, ऐकले तरी ते प्रत्येक वेळी नविन वाटते. आणि तुम्ही परिक्रमेची वर्णने इतकी सुंदर केलीत की त्यामुळे आपल्या लेखणीतून व्यक्त होणारे साहित्य उत्तमच असणार, आणि हा शब्द प्रपंच तर मैय्या करिता. मग काय? दुधात साखर.

Leave a comment