“वाट पाहीन पण यश्टी नेच जाईन”…मेळघाट नागपूर एस टी प्रवास.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनी आणि माझं पि.एच.डी या दोन्ही साठी मेळघाटात जाणं होत असतं, आणि प्रवास जस्तीत जास्त वे्ळा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लाल रंगाच्या बस नी करावा लागतो. आधी जरा अवघडायला व्हायचं, मग सवय झाली आणि आता आवड.

मेळघाट हे आपल्या भारतातलं कुपोषण ग्रस्त प्रदेशातलं एक महत्वपूर्ण ठिकाण. अमरावतीपासून सुमारे ४ तास मला लवादा (मेळघातलं एक छोटसं गावं) इथे जायला लागतात, आणि नागपूर हुन साधारण आठ- नऊ तास. पावसाळा असेल तर किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही…अशा वेळी आणि साधारण लहान सहान खेडेगावात ही यश्टी (इकडे S.T ला यश्टी म्हणतात) आपल्या जाहिरातीला खाली पडू देत नाही.

पूर्वी जेव्हा प्रायव्हेट ट्रान्स्पोर्ट कंपनी नवीन होत्या आणि अपघाताचे प्रमाण जास्त झाले होते तेव्हा “वाट पाहीन पण एस टी नेच जाईन” असे बोर्ड लागलेले दिसायचेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ही जाहीरात हे यश्टी चालक अजूनही पुरेपूर पार पाडत असतात..म्हणजे मोठ्या गावात यश्टी तशी वेळेवर येते पण लहान गावात तासा दोन तासाचा उशीर म्हणजे नोर्मल. तसं या लहान गावात दुसरी साधनं पण उपलब्ध नसतात..म्हण्जे फ़क्त यश्टी हेच स्वस्त साधन…मेळघाट तर जंगलच..इथला टायगर रिझर्व्ह एरिया प्रसिद्ध आहे. लवादा हे छोटसं गाव धारणी तालुक्यात येतं….वाघाच्या जंगलात..इथे यश्टी शीवाय काहीच नाही..म्हणजे मला वाट बघावीच लागते, आणि यश्टी नीच जावं लागतं….आणि मी पण ” वाट बघीन पण यश्टी नेच जाईन” असं म्हणत हा प्रवास करते.

या प्रवासात सगळ्यात महत्वाचं म्हणजं जागा मिळणं. त्या लाल रंगाच्या डब्याच्या पोटात जागा मिळाली तर फ़ारच छान नाहीतर दारावर लटकत लोंबकळत जाणं हे नेहमीचंच..मला मात्र जागा मिळते.मी ज्या एन जी ओ मधे जाते (संपूर्ण बांबू केंद्र) त्या केंद्रातल्या मॅडम/ताई म्हणून आजकाल लोक मला ओळखायला लागली आणि ताईना बसू द्या असे दोन चार आवाज ऐकू येतात आणि अडचणीत का असेना मला जागा मिळते..बाकीचे लोक मात्र अगदी टपावर सुद्धा बसून प्रवास करतात. तो कुठला शहारुख अणि प्रिटी चा पिक्चर? त्यात ते टपावर बसून जातात…ऐसा देस है मेरा का काहीतरी गाणं आहे, तो ? तसाच सीन असतो फ़क्त इथे गाणे वगरे म्हणत नाहीत.

या प्रवासाची काही खास वैषिष्ट्ये आहेत..एक म्हणजे कमालीची इमानदारी. इतकी गर्दी असूनही तुमची एकही गोष्ट कधी चोरीला म्हणून जाणार नाही. माझी बॅग आणि मी कधीच सोबत नसतो या बस मधे..कारनण मला जागा मिळते. बॅग कधी दाराजवळच्या सीट खाली, दाराला टेकू म्हणून, कधी ड्रायव्हर च्या पाठीला टेकायला लोड म्हणून, कधी कुण्या लहान मुलाला बसायला म्हणून वापरण्यात येते. आजपर्यंत माझ्या बॅग मधून कधीही काहीही चोरी गेलेलं नाही…अगदी परतवाड्याला गर्दी कमी झाल्यावर मला शोधून माझी बॅग मला सुपूर्त करण्यात येते…आमच्या मेळघाट ची माणसंच इमानदार! निसर्गाच्या सानिध्यात त्यांची माणुसकी कायम आहे.

या प्रवासातला अजून एक भाग म्हणजे आदिवासी स्त्रीया. बाजाराचा दिवस असेल तर इथलं रानातलं आदिवासी सौन्दर्य अनुभवायला मिळतं ते यश्टीतच. नखशिखांत श्रुंगार काय असतो तो इथे आल्यावर समजेल..म्हणजे दागीने इतके की नखही दिसू नये….असा श्रुंगार.. डोक्यावर पदर..पदरावर एक पट्टा, तो पदर पडू नये म्हणून असावा…डोक्याला बिंदी…या बिंदीचा आकार एक ईंच व्यासाचा नक्कीच असतो त्याला खाली छोटे छोटे लोलक लटकलेले असतात. लग्नात मुंडावळ्या बांधतो तसे अस्सल चांदी च्या मुंडावळ्यासारखेच काही मणी भुवयांना झाकून दोन्ही बाजूला लोंबकळत असतात. दोन्ही नाकपुड्या आणि दोन नाकपुड्या एकमेकाला जोडतात तिथे या तीनही ठिकाणी दागीने. कुणी कुणी हनुवटीला सुद्धा एखादी रिंग टोचवून घेतलेली असते. शीवाय दोन्ही कानात खांद्यावरून खाली लोंबतील इतके लांब कनातले आणि वर कानाच्या पाळीला २० तरी रिंगा घातलेल्या असतात..त्यांच्या पदराखाली गोमेसारख्या (सेन्टीपेड) दिसणा-या चांदीच्या काटेरी क्लिप्स पण असतात. मान दिसनार नाही अशी गळपट्टी , सुंदर नक्षीदार, चार इंच रुंद आणि गळ्याला फ़िट असते. मग गळ्यात छोट्या मोठ्या मण्यांच्या माळा असतात, बाजूबंद बांगड्या हातभर, कंबरपट्टा, छल्ला आणि पायात दहाही बोटात आणि पावलात जाडजूड विचिया आणि कडे घातलेले असतात..४०-४५ किलोच्या बाईच्या अंगावर ५-६ किलो चांदी नक्कीच असते.

Image

या बायकांच्या अंगावर कायम असणार्यापैकी म्हणजे वर्षा दोन वर्षांचं बाळ आणि कपड्याचं एक गाठोडं…ही बाई इतकी नखशिखांत झाकलेली असते की तिचे मिचमिच करणारे डोळे शोधून काढावे लागतात..आपापल्या नव-यांना या बायका अचूकपणे कशा काय सापडतात देव जाणे. डोक्याला मुंडासं आणि हातात काठी ..(म्हणजे बसमधे सुद्धा हातात काठी हवीच असते) असे यांचे नवरे पण कधी कधी यांच्या बरोबर दिसतात..

अधूम मधून बाहेरचं जग दिसत असेल तर आमच्या मेळघाटचे घाट आणि छोटे ओहोळ बघण्यासारखे आहेत..इथल्या घाटाचं वर्णन अजून कुण्या साहित्यकारानी का केलं नाही हा मोठा प्रश्न मला पडतो.. मोहाच्या झाडाची ट्प्पोरी फ़ुलं, सागाची झाडं, बांबूचं जंगल..पावसाळ्यात हिरवाईच्या देवीसारखा भासणारा हा मेळघाट अजून कसा काय कुणी उतरवला नाही? असो ते भाग्य बहुधा माझ्याकडे आहे.

परतवाड्यापर्यंत मेळघाट आणि आदिवासी दोन्हीही बस प्रवासातुन मोकळे झालेले असतात. मग शहरीकरणाला सुरवात होते. परतवाडा डेपोवर एक धष्ट पुष्ट माणूस नेहमीच बस मधे चढतो. मला या माणसाच्या भाषेची खूप गम्मत वाटते. हातात एक छोटसं पुस्तक घेऊन खास पुस्तकी भाषेत तो म्हणतो-

– “प्रवासी भाऊ आणि ताईंनो, जरा एक सूचना ऐका. आपण आजारी आहात काय? मग तुम्ही आपल्या बांधवांकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही आजारी नाहीत काय? मग आपल्या नातेवाईकांसाठी आणि आप्तेष्टांसाठी तुम्ही ही सूचना ऐका.

हे पुस्तक तुमच्या जीवनाला नवा आकार देणारं पुस्तक आहे….यात डाव्या बाजूला चित्र आणि उजव्या बाजूला आजार, त्याची लक्षणं व घरगूती उपाय दिलेले आहेत….”

बापरे अस्खलित पुस्तकी भाषा वापरणारा हा माणूस “घरचा वैद्य” नावाचं दहा रुपयांचं पुस्तक विकत असतो. यश्टी मधली मंडळी सुद्धा हा कुणी डॉक्टर, फ़ी न घेता उपाय सांगतोय असं वाटून मन लावून ऐकत असतात..एखादी आजी मावशी लगेच त्या माणसाला नागीणीचं (अंगावर डाग पडून आग होण्याचा एक आजार, skin infection) औषध विचारून घेते..शेवटी दहा रुपयांची ४-५ पुस्तकं विकून तो माणूस मधे कुठे तरी गायब होतो.

याच्या अगदी उलट वागणारा जलजीरा वाला..जलजी-याचे छोटे छोटे पुडे विकणारा हा माणूस प्रवाशांच्या इतका घरचा होतो की विचारू नका.. मावशी काका, भाऊ, ताई सगळी नाती जोडून झालेली असतात.. देवळात प्रसाद वाटावा तसा हा एका स्टील च्या डब्ब्यातून जलजीरा पावडर वाटत असतो..”घ्या ताई, घे बेटा बाली, पहा सांडू नको…मस्त हाय नं?” वगरे वगरे…एखादा प्रवासी नाही म्हणालाच तर आग्रह आहेच..

“अहो घेऊन तर बघा नं..चव तर बघा, कसा झालाय ते तरी सांगा नं राव..पैशे मागतो का मी…अरे घे रे दादा, ए मावशी सांग गं दादाला..अरे माझ्या भाच्यासाठी घेऊन जा नं..असाच घेऊन जा..अरे रोज पाण्यात टाकून प्यायचा मस्त..पोट गीट साफ़ यकदम…”

मधेच..”मावशी तुमच्या कडल्या गाई यंदा दूध जास्त देतात का वो? म्हातारीच्या चेह-यावर तेज हाय…घे वो मावशे खाऊन पाय..” म्हणजे कदाचित हा आपला रोजचा शेजारी किंवा आत्ये मामे भाऊच असावा असा प्रत्येक प्रवाशाचा समज झालाच पाहिजे असा याचा व्यवहार…

या प्रवासातली पुढची मजा म्हणजे काही खास प्रकारचे प्रवासी…एखादा प्रवासी कुठल्याश्या साई मंदीरात दर्शनाला जात असावा असा माझा समज झाला..कुठल्याश्या चायना मेड फ़ोन च्या कर्ण कर्कश्श आवाजातून हा साईगीतं अख्य्या यश्टी ला ऐकवत होता…मला वाटलं याचा नवस पूर्ण वगरे झाला असावा..थोड्या वेळाने हा पठ्ठा गाऊ लागला….मग साईगीत संपली..जरा वेळ शांतता..मला वाटला चला, याचं दर्शन सफ़ल…असा विचार येतो न येतो तोच त्याने आपलं कलेक्शन दाखवायला सुरवात केली…अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का पासून तर माता ने बुलाया है पर्यंत सगळी गाणी हा अर्धवट वाजवून बंद करायचा…शेवटी दुस-या प्रवाशांनी सहनशक्ती सोडल्यावर याची भक्ती आणि संगीतप्रेम संपुष्टात आलं.

एक न दोन असे अनेक वेगवेग्ळे दृष्य माझ्या संग्रही जमा झालेले आहेत..वेळे अभावी आज इतकच..एक मात्र नक्की मेळघाट ला भेट जरूर जरूर द्या..तिथल्या आदिवासिंना विकासासाठी मदत करा आणि स्वत:च्या गाड्यांनी जमत असेल तरी एकदा हा प्रवास यश्टी ने कराच, एक दा तरी म्हणाच ….”वाट पाहीन पण यश्टी नेच जाईन”

सौ सुरुचि

One thought on ““वाट पाहीन पण यश्टी नेच जाईन”…मेळघाट नागपूर एस टी प्रवास.

  1. व्वा !! मस्तच …खूप छान ..मेळघाट आणि य्स्टी प्रवास ..खूपच आवडला .मेळघाट ची जादुई वर्णन मी खूप ऐकून आहे पण कधी जांयचा योग आला नाही.एक मात्र खर मला सुद्धा एस.टी चा प्रवास खूप खूप आवडतो.नाईलाजाने कधी कधी व डा प .ने प्रवास करावा लागतो.माझी सासुरवाडी राधानगरी असल्याने .घाटमार्गाने जाताना निसर्गाचा आस्वाद घेत .वळणवळणातून एस.टी नगीनी सारखी सळसळत जाते.कोकणातला लाल धुरळा उडवत ..मधेच कुठेतरी ओल्या मातीचा सुगंध मनाला आल्हादून जातो…पावसाळ्यात तर बातच और ..हा आस्वाद घ्यायला एस.टी नेच प्रवास करावा आणि तोही खिडकी असलेल्या शिटवर…घाट माथ्यावरच सौंदर्य न्ह्यालताना मन कस हरवून जात .अगदी स्व चा ही विसर पडतो …

    धन्यवाद.

Comments are closed.